Plantation

वृक्षारोपण

वृक्षवल्ली आम्हा सोयरे - तृप्ती देसाई

विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या जोरावर आपला देश दिवसेंदिवस प्रगती करत आहे आणि हे सर्वांसाठीच अभिमानास्पद आहे. पण प्रगतीच्या वाटेवर चालताना होणारे औद्योगिकीकरण, शहरीकरण यांमुळे अनेक पर्यावरणीय समस्या वाढत आहेत.

कारखान्यांच्या धुराड्यातून कार्बन डाय-ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड यांसारखे अपायकारक वायू बाहेर पडल्याने हवेचे प्रदूषण होते. रस्त्यांवर धावणाऱ्या असंख्य गाड्यांमार्फत सुद्धा सजीव सृष्टीला अपायकारक असणारे अनेक घातक वायू वातावरणात मिसळले जातात.

शहरीकरण आणि इतर कारणांसाठी होणाऱ्या जंगलतोडीमुळे पावसाचे आणि हवेतील ऑक्सीजनचे प्रमाण कमी होते.

सद्य परिस्थिती पाहता वातावरणात वाढत्या प्रदूषणामुळे या दिवसात वृक्षारोपण करण्याची आवश्यकता अधिकच वाढली आहे. आपणास माहीत आहे की झाडे हा ऑक्सीजनचा नैसर्गिक स्त्रोत आहे आणि त्यांच्या श्वसन प्रक्रियेतून हवेतील कार्बन डाय ऑक्साईड शोषला जातो.

या व्यतिरिक्त हवेतील बाष्प शोषून घेऊन हवेत थंडावा निर्माण करणे, जमिनीची धूप थांबविणे, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे, ओझोनचे प्रमाण वाढविणे तसेच वातावरणातील हानिकारक प्रदूषकांना शोषून घेणे अशी अनेक महत्वाची कामे सुद्धा झाडे करतात. त्यामुळे अधिकाधिक झाडे लावल्यास वायू प्रदूषण नियंत्रित केले जाऊ शकते.

अनेक वन्य जीवांना आसरा देऊन पृथ्वीवरील  जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल राखण्यात झाडांची महत्वपूर्ण भूमिका आहे.

जर हीच झाडे पैसे किंवा आपल्याला आकर्षक आणि पाहिजे असणाऱ्या गोष्टी देणारी असती तर आपण अशी असंख्य झाडे लावून त्यांचे जतन केले असते. पण आपल्या नजरेस न दिसणारे परंतु आपल्या जीवास अत्यंत गरजेचे काम झाडे दिवसरात्र करत असतात मग तरी आपण त्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष करतो.

जर खरोखरच आपल्याला आणि आपल्या पुढील पिढ्यांना दूषित वायू नसलेला मोकळा श्वास घ्यायचा असेल आणि आपल्या सृष्टीची हानी होण्यापासून थांबवायचे असेल तर आपण सर्वांनी जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे आणि त्यांचे संवर्धन केले पाहिजे.*

छोट्या छोट्या उपक्रमांतून आपण याला सुरुवात करू शकतो.

 १. कोणत्याही कारणासाठी शुभेच्छा देताना एक रोप भेट म्हणून देणे.

 २. कार्यक्रमात पाहुण्यांचा, विद्वानांचा आदर व्यक्त करायला पुष्पगुछाऐवजी रोप भेट देणे.

 ३.  आपल्या सोसायटीच्या आवारात, आपल्या घरातील टेरेस अशा जागी उपयोगी झाडे लावणे.

 ४. ओसाड जंगली भागात होणाऱ्या वृसक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होणे. इत्यादी.

 आपल्याकडे काही नावीन्यपूर्ण कल्पना असल्यास आम्हाला नक्की कळवा.