Sudama Vatika Society

सुदामा वाटिका सोसायटी


कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे उपायुक्त श्री रामदास कोकरे यांनी सुदाम वाटिका सोसायटीने केलेला कचरा वर्गीकरणाचा प्रयोग सोसायटीस प्रत्यक्ष भेट देऊन पाहिला व त्याचे खूप कौतुक केले व इतर सोसायट्यांनी पण अश्याप्रकारे कचरा वर्गीकरणासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान केले आहे. सुदाम वाटिका सोसायटीने हे काम कसे केले ते सांगत आहेत सोसायटीचे सेक्रेटरी श्री प्रमोद परुळेकर ..... 

मी गेली साडेतीन वर्षे सुदाम वाटिका सोसायटीचा सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहे. मी पेशाने मरीन इंजिनियर  असून मला विविध प्रकारच्या जहाजांवर काम करण्याचा २३ वर्षांचा अनुभव आहे. ३० एप्रिल २०२० रोजी मला कल्याण डोंबिवली महानगर पालिकेकडून कचरा वर्गीकरणासंबंधी एक नोटीस आली. त्यात स्पष्टपणे असे नमूद केले होतें कि सोसायटीस यापुढे वर्गीकरण न करता कचरा देता येणार नाही. क.डों.म.पा ची घंटागाडी वर्गीकरण न केलेला कचरा स्वीकारणारच नाही. त्या नोटीससीत फक्त ओला/सुका असे वर्गीकरण नव्हते तर सुक्या कचर्याचे आणखी आठ भागात वर्गीकरण केले होतें. उदा काच, प्लास्टिक, कागद वगैरे. हे एक मोठे आव्हान होतें व त्यासाठी मुदत पण खूप कमी दिवसाची होती. पण मला माझ्या मर्चंट नेव्हीमधील म्हणजेच जहाजावरील कामाचा अनुभव होता. अगदी पाणबुडीच्या देखभालीचे (मेंटेनन्स) काम मी केले आहे. जहाजांवर काम करताना त्या जहाजाकडून पाण्याचे/ हवेचे प्रदुषण होऊ नये म्हणून काही कडक नियम आहेत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे आहेत व या नियमांचे पालन करण्याची मला सवय आहे.

मर्चंट नेव्हीच्या जहाजांवर अनेक प्रकारचा कचरा तयार होतो. नेहमीचा ओला /सुका कचरा होतोच.  शिवाय बँटरी, वापरलेले खराब तेल,  विवीध रासायनीक द्रव्ये वगैरे. या सर्व कचर्याचे विलगीकरण काटेकोरपणे केले जाते व जहाज बंदरात आल्यावर सदर कचरा बंदर व्यवस्थापनाकडे दिला जातो व त्यांच्याकडून दिलेल्या कचर्याची तपशीलवार पावती दिली जाते. सदर पावती जपून ठेवावी लागते. कारण पुढील कोणत्याही बंदरात जहाजात निर्माण झालेल्या कचर्याची विल्हेवाट कशी लावली याबाबत कधीकधी विचारले जाते व समाधानकारक ऊत्तर न दिल्यास, ,पावती न दाखवल्यास नियमभंग झाल्याचे समजून मोठा दंड आकारला जातो. जहाजावर  मला कचरा वर्गीकरणाचा अनुभव आहे. त्यामुळे महापालिकेची यासंबंधात नोटीस आल्यावर मी जवळपास एकहाती एक छोटेखानी Garbage station आमच्या सोसायटीच्या आवारात गेटला लागून तयार केले. लाँकडाऊन म्हणजे बाहेरून काही वस्तू आणणे शक्य नव्हते. कोणी कामगार पण उपलब्ध नव्हते. आमच्या सोसायटीतील सभासदाकडे उपलब्ध साधनसामुग्री वापरून त्याची उभारणी केली. त्यामधे महापालिकेने सांगीतल्याप्रमाणे नऊ प्रकारचा कचरा ठेवण्याची व्यवस्था केली आहे. व कुठला कचरा कुठे टाकावा हे स्पष्टपणे लिहीले आहे.

प्रत्यक्ष कामाबद्दल सांगायचे तर आमच्याकडे तीन मोठे प्लास्टिक चे डबे होतें. पण वर्गीकरणासाठी ते पुरेसे नव्हते. त्यामुळे आठ मोठी पोती/पिशव्या घेतल्या. त्या वरील बाजूस दुमडून एक कॉलर बनवली. त्या कॉलर मधे लाकडी पट्टी फिक्स केली . मग त्या पट्टीवर लोखंडी पत्र्यापासून हुक बनवून ते फ़िक्स केले व एका पाईपचा वापर करून पिशव्या लटकावण्याची सोय केली. 

कचरा वर्गीकरणाची नुसती सोय करून चालणार नव्हते. तर सोसायटीतील सभासदांचे यासंबंधी प्रबोधन करणे आवश्यक होते. आमच्या इमारतीमधे प्रत्येक मजल्यावर चार ते पाच सदनिका आहेत. महापालिकेची नोटीस आल्यावर प्रत्येक मजल्यावर जाऊन सभासदांना नोटीसीबाबत तपशीलवार माहिती दिली व आपण कशाप्रकारे कचर्याचे वर्गीकरण /विलगीकरण करायचे ते समजाऊन सांगितले. सुरवातीला खूप अडचणी आल्या. पण आता सर्व सुरळीत चालू आहे. मध्यंतरी महापालिकेचे उपायुक्त श्री रामदास कोकरे हे स्वतः सोसायटीत आले होते व त्यांनी आमच्या उपक्रमाचे खूप कौतुक केले. 

सध्या करोना साथीमुळे सर्व सभासद स्वतः त्यांच्या घरातील कचरा योग्य ते वर्गीकरण करून घंटागाडी येण्याआधी निरनिराळ्या कचरापेटीमधे ठेवतात व तो प्रत्यक्ष घंटागाडीत देण्याचे काम स्वीपर करते. नंतर मात्र स्वीपर ओला कचरा पुर्वीप्रमाणे घरोघरी जाऊन गोळा करेल तर सुका कचरा सभासद त्यांचे वर्गीकरण करून घंटागाडी येण्याआधी योग्य त्या बँगमधे ठेवतील व स्वीपर तो प्रत्येक्ष घंटागाडीस देईल असे नियोजन आहे. 

धन्यवाद!
प्रमोदकुमार परुळेकर,
सेक्रेटरी, सुदाम वाटिका सोसायटी, गडकरी रोड, सीकेपी हॉलजवळ, डोंबिवली (पूर्व)